शनिवार, ९ जानेवारी, २०१०

रायगड जिल्हा


रायगड किल्ला - छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यांचा व राज्यकारभाराचा खरा साक्षीदार असा हा रायगड किल्ला! महाडपासून २५ कि.मी. वर असलेला हा दुर्ग गांधारी व काळ अशा दोन नद्यांच्या उगमस्थानाजवळ वसलेला आहे. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक याच किल्ल्यावर इ. स. १६७४ मध्ये संपन्न झाला.

हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला हा किल्ला केवळ नुसता एक गड नसून ते एक राष्ट्रीय स्मारक आहे. रायगडावर शिवछत्रपतींची समाधी, भवानी मंदिर, टकमक टोक, जगदीश्वर मंदिर, पालखी दरवाजा, नगारखाना, वाघदरवाजा, मीना दरवाजा, होळीचा माळ, बाजारपेठ इत्यादी प्रमुख स्थळे पाहायला मिळतात. सुमारे ३३० वर्षांपूर्वीचे बांधकाम असूनही, आजही काही बांधकाम आपल्याला येथे पाहण्यास मिळते. त्या अवशेषांवरून तत्कालीन स्थापत्यकलेची व भव्यतेची साक्ष पटते. प्रशासनिकदृष्ट्या महाड तालुक्यात असलेल्या या गडाचे दर्शन आजही अंगावर रोमांच उभे करते.

पाली - सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी असलेल्या परिसरात व अंबानदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात पाली येथे अष्टविनायकांपैकी श्री बल्लाळेश्वर गणपतीचे मंदिर आहे. येथे जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे आहेत व सरसगड किल्ला आहे.

महड - येथेही अष्टविनायकांपैकी श्री वरदविनायक गणेशाचे मंदिर प्रसिद्ध आहे. महड हे स्थान खालापूर तालुक्यात आहे.

अलिबाग व परिसर - समुद्रकिनारी वसलेले हे छोटे शहर रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. समुद्रकिनार्‍यापासून जवळच कुलाबा हा जलदुर्ग आहे. या किल्ल्यामुळे जिल्ह्याला पूर्वी कुलाबा असे नाव देण्यात आले होते. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मायनाक भंडारी या आरमारप्रमुखाचे वास्तव्य होते. हा किल्ला प्रबळ असल्याने १६८० नंतर मराठी आरमाराचे कान्होजी आंग्रे यांनीही आपली सत्ता येथूनच राबवली. सरखेल कान्होजी आंग्रे यांचे स्मारक अलिबाग येथेच आहे. या किल्ल्यामध्ये गोड्या पाण्याचा एक तलाव व एक विहीर आहे. तसेच एका बुरुजावर उत्तम स्थितीतल्या दोन तोफाही आहेत.अलिबागजवळच खांदेरी व उंदेरी असे दोन भव्य जलदुर्गही आहेत. खांदेरी किल्ल्यावर बोटींना मार्गदर्शन करणारे दीपगृह आहे.

श्रीवर्धन - श्रीवर्धन हे पेशव्यांचे मूळ गाव होय. ३ किमी. लांबीचा अथांग, शांत, मनाला निवांत करणारा सागरतीर हे श्रीवर्धनचे मुख्य आकर्षण होय. येथील पेशवे मंदिरातील चौथर्‍यावर पेशवे स्मारक बांधण्यात आले आहे. या ठिकाणी सोमजाई मंदिर, जीवनेश्वर मंदिर, राम मंदिर, कुसुमादेवी मंदिर अशी अनेक मंदिरे पाहायला मिळतात.

श्री हरिहरेश्र्वर - श्रीवर्धनला जोडूनच पर्यटकांच्या तोंडी हे नाव येते. हे श्रीशंकराच्या प्राचीन मंदिरामुळे प्रसिद्ध असलेले ठिकाण श्रीवर्धन तालुक्यात आहे. येथील समुद्रकिनाराही पर्यटकांचे आकर्षण आहे. हे जागृत स्थान दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते.

काशीद बीच - मुरूडहून १८ किमी. अंतरावर गोव्यामधील बीचची (किनार्‍याची) आठवण करून देणारा रूपेरी वाळूचा स्वच्छ-सुंदर काशिदचा समुद्रकिनारा विदेशी पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.

दिवे आगर - श्रीवर्धन तालुक्यातील शिलाहारांची प्राचीन राजधानी असलेले दिवेआगर हे ठिकाण प्रसिद्ध आहे. येथे तांब्याच्या पेटीत गणपतीची सोन्याची मूर्ती सापडल्याने ह्या स्थानास धार्मिक स्वरूप प्राप्त झाले आहे. येथील श्री रूपनारायण मंदिर हे देखील दर्शनीय आहे. याच ठिकाणी मराठी भाषेचे उल्लेख असलेले प्राचीन अवशेष सापडले आहेत.

घारापुरी (एलिफंटा) लेणी - घारापुरी हे ठिकाण मुंबईपासून जवळ आहे, परंतु ते प्रशासकीयदृष्ट्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात आहे. ‘एलिफंटा गुंफा’ या समुद्रात असलेल्या हरितबेटावर सातव्या शतकापासून अस्तित्वात आहेत. येथे शिवाची कातळामधील, प्राचीन जगप्रसिद्ध महेशमूर्ती पाहायला मिळते. येथेच वनोद्यानही विकसित करण्यात आले आहे.

शिवथर घळ -
महाड तालुक्यात वरंधा घाटात हे स्थान आहे. येथे श्री समर्थ रामदासांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला असे मानले जाते. येथे श्री समर्थ रामदासांचे दहा वर्षे वास्तव्य होते. येथील धबधबा, घनदाट जंगल, नैसर्गिक घळ व पवित्र शांतता यांमुळे पर्यटक येथे गर्दी करतात. येथील निसर्ग सुंदरतेचे वर्णन दासबोधामध्येही लिहिलेले आढळते.

श्री कनकेश्वर - श्री परशुरामाने निर्माण केलेल्या कनकडोंगरी या उंच टेकडीवर सुंदर कोरीव काम केलेले शंकराचे मंदिर आहे. कनकेश्वर मंदिराची उंची ५४ फूट आहे. श्री कनकेश्वर हे निसर्गाची पार्श्र्वभूमी लाभलेले प्राचीन स्वयंभू शिवस्थान आहे.

जंजिरा किल्ला - अरबी समुद्रावरील अजिंक्य व बलाढ्य किल्ला म्हणून जंजिरा किल्ला प्रसिद्ध आहे. मुरूडपासून जवळच राजापुरी खाडीत हा जलदुर्ग उभा आहे. स्वराज्याच्या काळात सिद्दींच्या वर्चस्वाखाली हा किल्ला जिंकण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले.

साळावचे बिर्ला मंदिर - रेवदंड्यापासून जवळच साळाव या गावात बिर्ला ग्रुपने बांधलेले श्री गणपतीचे भव्य मंदिर आहे. येथे मंदिराच्या बाजूने खास तयार केलेली हिरवळ, आणि मंदिरातील प्रकाशयोजना भारावून टाकणारी आहे.

महाड - महाड येथील १९२७ सालचा चवदार तळ्याचा सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध आहे. चवदार तळे तत्कालीन अस्पृश्यांना खुले व्हावे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या आंदोलनामुळे चवदार तळ्यास ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. आंदोलनाची आठवण म्हणून येथे क्रांतिस्तंभ उभारण्यात आला आहे.

माथेरान - माथेरान हे कर्जत तालुक्यात असून सह्याद्रीच्या पश्र्चिम घाटात ८०० मी. उंचीवर वसलेले थंड हवेचे ठिकाण आहे. घनदाट वने व नैसर्गिक सौंदर्य लाभलेले हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षण आहे. येथे पोहोण्यासाठी धावणारी नेरळ-माथेरान ही ‘नॅरोगेज’ रेल्वे सुद्धा अकर्षक असून, ही रेल्वे निसर्गाचा वेगळाच अनुभव आपल्याला देते.

फणसाडचे अभयारण्य - नबाब काळातील केसोलीचे जंगल म्हणजेच आत्ताचे फणसाडचे अभयारण्य. एका बाजूला अरबी समुद्र व दुसर्‍या बाजूला गर्द वनराईने नटलेला डोंगर प्रदेश असलेले हे अभयारण्य ५२.७१ चौ.किमी. क्षेत्रात पसरलेले आहे. शेकडो प्रकारचे पक्षी, फुलपाखरे, औषधी वनस्पती, विविध प्राणी या सगळ्यांनी हे अभयारण्य परिपूर्ण आहे.

कर्नाळा - पनवेल जवळ सुमारे १० किमी. अंतरावर कर्नाळा हा प्रचंड डोंगरी किल्ला वसलेला आहे. ५०० मीटरहून अधिक उंच असलेला हा किल्ला पर्यटकांचे व गिर्यारोहकांचेही मुख्य आकर्षण आहे. येथे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे. किल्ल्याच्या सभोवती साडेचार किमी. क्षेत्रात हे अभयारण्य पसरलेले आहे.

बारा ज्योतिर्लिंगे


1. सोमनाथ - सोरटी सोमनाथ- काठेवाडचे दक्षिणेस असलेल्या वेरावळ बंदराला समुद्रमार्गाने आणि रेल्वेने जातां येते. वेरावळहून प्रभासपट्टण तीन मैल लांब आहे. प्रभासपट्टमला सोमनाथाचें देऊळ आहे. क्षय नाहींसा होण्याकरितां सोमानें (चंद्राने) लिंग स्थापून पूजा केली, म्हणून ते सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले.


2. मल्लिकार्जुन - गुंटकल बेसवाडा - या छोट्या लाइनवर नंद्याळ स्टेशन आहे. तेथून 28 मैलांवर असलेल्या आत्माकुमार गांवाला मोटारीने जावें लागतें. आत्माकुरहून मल्लिकार्जुन 43 मलै श्रीशैल्यपर्वतावर आहे. रागावून गेलेल्या कुमार कार्तिकेयाला भेटण्याक‍िरतां (मल्लिका) पार्वती व अर्जुन (शंकर) येथें आले म्हणून मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध झाले. मल्लिकार्जुनाच्या पलीकडे पांच मैलांवर पाताळगंगा (कृष्णा) आहे.

3. महाकाळेश्वर - उज्जयिनीस प्रसिद्ध आहे.
शिवशंभोचे 'महाकाल'रूप

4. अमलेश्वर - ओंकारमांधाता. उज्जयिनी-खंडवा रस्त्यावर मोरटक्का स्टेशनापासून दहा मैलांवर नर्मदेच्या-कांठीं आहे. हें नर्मदेच्या दुभंग झालेल्या बेटांत डोंगरावर आहे. तेथेच गौरी सोमनाथ व भैरवशीला ही स्थानें आहेत. दुसरें ॐकार या नांवाचें लिंग नर्मदेच्या दक्षिण तीरावर आहे. हा सर्व भाग ॐकारच्या आकाराचा आहे, म्हणून यास ओंकारअमलेश्वर असें म्हणतात.
ओंकारेश्वराची शाही स्वारी

5. वैद्यनाथ - शिवपुराणांतील श्लोकाप्रमाणें 'वैद्यनाथं चिता भूमौ' असा पाठ आहे. संथाल परगण्यांत पूर्व रेल्वेवरील जसीडोह स्टेशनापासून तीन मैल दूर ब्रँच लाइनवर वैद्यनाथ आहे. तेथील शिवालय प्रशस्त आहे. या स्थानीं कुष्ठरोगापासून मुक्त होण्याकरितां पुष्कळ रोगी येतात. बहुतेक विद्वानांच्या मतें हें ज्योतिर्लिगाचें स्थान आहे. दक्षिणेंत बारा ज्योतिर्लिगाच्या श्लोकांत 'वैद्यनाथ चिता भूमौ' याऐवजी 'परल्यां वैजनाथं' असा पाठ आहे. परळीवैजनाथयाचें स्थान मराठवाड्यांत परभणी स्टेशनापासून चोवीस मैल दक्षिणेस आहे.

6. भीमाशंकर - भीमाशंकर - खेड- जुन्नरद्दून थेट भीमाशंकराच्या देवळापाशीं रस्ता जातो. कर्जतवरून आणि खेड-चासहून रस्ते आहेत. भीमानें राक्षसाचा वध केल्यामुळें भीमाशंकर नांव प्रसिद्ध झाले. आसाम प्रांतांत कामरूप जिल्ह्यांत उत्तर-पूर्व रेल्वेवर गौहत्तीजवळ ब्रह्मपूर नांवाचा पहाड आहे. त्या पहाडवरील लिंगाला कांहीं लोक भीमाशंकर म्हणतात. नैनीताल जिल्ह्यांत उज्जनक येथें एका विशाल मंदिरांत मोठ्या घेराचें आणि दोन पुरुष उंचीचें लिंग आहे. त्यालाच कांहीं लोक भीमाशंकर म्हणतात.

7. रामेश्वर - दक्षिण भारतांत प्रसिद्धच आहे. रामचंद्राने याची स्थापना केल्यामुळें याला असें नांव पडलें.

8. नागेश्वर - श्लोकांतील पाठ, 'नागेश दारुकावने' असा आहे आणि त्याप्रमाणें द्वारकेजवळचें लिंग तें हेंच ज्योतिर्लिग होय, असें बर्‍याच लोकांचे म्हणणें आहे. गोमती द्वारकेपासून थेट द्वारकेला जाणार्‍या रस्त्यावर बारा-तेरा मैलांवर पूर्वोत्तर रस्त्यावर हें स्थान आहे. औंढ्या नागनाथ हेंच नागेश ज्योतिर्लिंग होय, असें दक्षिणेतील लोकांचे म्हणणें आहे. मराठवाड्यांत पूर्णा-हिंगोली ब्रँचवर चौडी स्टेशन लागतें. तेथून पश्चिमेस चौदा मैलांवर हें स्थान आहे. आल्मोडापासून सतरा मैलांवर उत्तर-पूर्वेस योगेश (जागेश्वर) शिवलिंग आहे. त्यालाच कांहीं लोक नागेश ज्योतिर्लिंग म्हणतात.

9. काशीविश्वेश्वर - वाराणशीस (काशीस) प्रसिद्धच आहे. जगाच्या प्रलयकालांत शंकर ही नगरी त्रिशूलावर धारण करतो.
शिवशंभोचे 'काशी विश्वेश्वर' रूप

10. त्र्यंबकेश्वर - नाशिकहून बीस मैलांवर पश्चिमेस गौतम ऋषिच्या विनंतीवरून गंगा येथें आली व शंकर लिंगरूपानें आले.
ओम त्र्यंबकम यजामहे...

11. केदारेश्वर - हिमालयावर हरिद्वारहून केदार 150 मैल आहे. केदारनाथाचें देऊळ वैशाख ते आश्विन उघडें असतें. नंतर कार्तिकापासून चैत्रापर्यंत तें बर्फांत बुडालेलें असल्यामुळे बंद असतें.

12. घृष्णेश्वर - (घृश्मेश्वर) दौलताबाद स्टेशनापासून दहा मैलांवर घृष्णेश्वर आहे. शेजारी शिवकुंड (शिवालय) नांवाचें सरोवर आहे. घृष्णेच्या (घृश्मेच्या) प्रार्थनेवरून शंकर येथें स्थिर झाले म्हणून घृणेश्वर (घृश्मेश्वर) म्हणतात.

गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे. सह्याद्री पर्वतातील नैसर्गिक मूर्ती आणि त्याच्या पश्चिमे


गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे. सह्याद्री पर्वतातील नैसर्गिक मूर्ती आणि त्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आगळे आहे. गणपतीची मूर्ती स्वयंभू असल्याने त्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. १ कि. मी. लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय दिसतो.

गणपतीपुळे रत्नागिरीपासून सुमारे ४० कि. मी. लांब आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (S.T.) मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे येथे थेट बससेवा पुरवते.

गणपतीपुळे यथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ (M.T.D.C.) चे विश्रामगृह आहे. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरीसुद्धा राहण्याची सोय होऊ शकते.

अष्टविनायक

चिंतामणी

पुणे जिल्ह्यातील व पुणे शहरापासून अगदी नजिक असलेल्या या देवस्थानी असलेला गणपती `श्रीचिंतामणी' या नावाने ओळखला जातो.

थेऊर येथील गणेशमूर्ती स्वयंभू व उजव्या सोंडेची आहे. मंदिराचे महाद्वार उत्तरभिमुख आहे पण मूर्ती मात्र पूर्वाभिमुख आहे. मंदिराचे आवार प्रशस्त असून सभामंडपही मोठा आहे. देवळाच्या तिन्ही बाजूंना मुळा व मुठा या दोन नद्यांचा वेढा आहे.

पुणे नजिकच्या चिंचवड येथील मोरया गोसावी या तपस्वी पुरूषाने या ठिकाणी गणपतीची उपासना करून सिद्धी प्राप्त केली होती, असा ऐतिहासिक दाखला असून थेऊर येथील मंदिर मात्र मोरया गोसावी यांचे सुपुत्र चिंतामणी देव यांनी बांधले आहे. श्रीमंत माधवराव पेशवे यांना या गणेशस्थानाबद्दल अखेरपावेतो प्रेम वाटत होते. त्यांचा मृत्यूही या मंदिराच्या आसमंतातच झाला.


सिद्धीविनायक

हे गणेश स्थान अहमदनगर जिल्ह्यात आहे. दौंड आणि श्रीगोंदा या ठिकाणापासून जवळ आहे. `सिध्दीविनायक' नावाने येथील गणपती प्रसिध्द आहे. येथील गणेशमूर्ती स्वयंभू असून ती उजव्या सोंडेची आहे. तिचे रूप गजमूख आहे.

मंदिर उत्तराभिमुख असून गाभारा मात्र प्रशस्त आहे. जवळच भीमा नदी असल्याने या नदीच्या परिसरात सुंदर घाट बांधण्यात आले आहेत. जवळच विष्णू, शिवाई, महादेव आदि देवांची मंदिरे आहेत.



महागणपती

हे देवस्थानही पुणे जिल्ह्यातच असून पुणे-नगर रस्त्यावर आहे. येथील गणपती `श्रीमहागणपती' या नावाने प्रसिद्ध आहे. मंदिरात असलेली मूर्ती ही दर्शनी मूर्ती आहे. मूळ मूर्ती मात्र तळघरात दडलेली आहे असा समज असून ती २० हात व १० सोंडी असलेली असावी असा तर्क आहे.

मंदिर पूर्वाभिमुख असून त्यास इंदूरचे सरदार किबे यांनी सभामंडप बांधलेला आहे. गाभारा श्रीमंत माधवराव पेशवे यांनी बांधला असून शिंदे, होळकर आदि सरदारांनीही बांधकाम तसेच इनामाच्या स्वरूपात मोठे सहाय्य दिले आहे.


बल्लाळेश्वर

रायगड जिल्ह्यातील खोपोली या शहरापासून हे स्थान जवळ आहे. येथील गणपती `बल्लाळेश्वर' या नावाने प्रसिध्द आहे.
देवस्थानातील डाव्या सोंडेची गणेशमूर्ती तीन फूट उंच आहे. तिचा आकार थोडा रुंद असून मस्तकाचा भाग थोडासा घोलगट आहे.

मंदिराची बांधणी रेखीव असून ते पूर्वाभिमुख आहे. या देवस्थानाच्या मागेच एक स्वयंभू गणपतीचं मंदिर आहे. व तेथील गणपती धुंडीविनायक म्हणून ओळखला जातो. कल्याण श्रेष्ठींचा मुलगा बल्लाळ याच्या उपासनेतूनच प्रगट झालेला हा गणपती म्हणून त्यास बल्लाळेश्वर असे नाव पडले.


विघ्नहर

ओझर येथील गणपती `विघ्नहर' या नावाने ओळखला जातो. येथील गणेशमूर्ती स्वयंभू व डाव्या सोंडेची असून ती पूर्णाकृती व आसन मांडी घालून बसलेली आहे. गणेश मंदिर पूर्वीभिमुख आहे व त्यासमोर ओळीने तीन सभामंडप आहेत. गाभाऱ्यात पंचायतनातील इतर चार मूर्त्या कोनाड्यात स्थापलेल्या आहेत. देवळाच्या आवारात दीपमाळ आहे.

हे मंदिर अठराव्या शतकातील असावे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. चिमाजी अप्पाने वसईचा किल्ला जिंकल्यावर या मंदिरावर सोन्याचा कळस चढवला असे म्हणतात. अलीकडेच या मंदिराची जीणोध्दार झाला. श्रीमंत बाजीराव पेशवे हे या विघ्नहराचे निस्सीम भक्त होते. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील हे देवस्थान नारायणगावपासून ८ कि.मी. अंतरावर कुकडी नदीच्या काठी आहे.


मोरेश्वर

पुणे जिल्ह्यातील मोरगाव या गावी असलेले हे गणेशस्थान मोरेश्वर अथवा `मयुरेश्वर' या नावाने ओळखले जाते. या देवस्थानी असलेली श्रीगणपतीची मूर्तीसुद्धा स्वयंभूच आहे. मूर्तीचे सोंड डावीकडे असून डोईवर नागफणा आहे. मंदिर उत्तराभिमुख असून बांधणी चांगली आहे. आवारात दीपमाळ आहे. या मंदिराच्या परिसरातूनच कऱ्हा नदी वाहते. मंदिराच्या समोरच्या चौथऱ्यावर भव्य नंदी असून जवळच पाषाणाचा उंदीर आहे.

गाणपत्य संप्रदायाचे हे स्थान म्हणजे आद्यपीठ असून अष्टविनायकात या स्थानाला अग्रस्थान आहे. मोरया गोसावी यांनी या ठिकाणीही तपश्चर्या केली होती व या स्थानाच्या परिसरातील कऱ्हा नदीत त्यांना गणेशमूर्ती प्राप्त झाली होती. पुढे हीच मूर्ती चिंचवडला आणून त्यांनी प्रतिष्ठापना केली.


वरदविनायक

रायगड जिल्ह्यातील महड या ठिकाणी असलेले हे गणेश स्थान `वरदविनायक' या नावाने प्रसिध्द आहे. `मढ' असेही या स्थानास संबोधले जाते.

दगडी सिंहासनावर बसलेली ही मूर्ती देवस्थानाजवळील तळयात तीनशे वर्षापूर्वी पौडकर नामक एका गणेशभक्तास सापडली. त्याने तिची एका दगडी कोनाड्यात स्थापना केली. पुढे बिवलकर नावाच्या भक्ताने या मूर्तीवर मंदिर बांधले. मंदिरात गेल्या शंभर वर्षाहून अधिक काळ अखंड नंदादीप तेवत ठेवला आहे.


गिरीजात्मक

लेण्याद्री हे पुणे जिल्ह्यातच असून येथील श्रीगणेशास `गिरिजात्मक' या नावाने संबोधले जाते. येथील मूर्ती इतर स्थानी असलेल्या गणपतींप्रमाणे रेखीव नाही. मंदिरही छोटेखानी आहे.

पुणे-जुन्नर मार्गावर जुन्नरपासून अवघ्या ५-६ कि.मी. अंतरावर कुकडी नदीच्या परिसरात हे स्थान डोंगरावर आहे. हा डोंगर लेण्याद्री डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी बौद्धकालीन गुंफा असून या गुंफातच हा गणपती आहे.

मूर्तीच्या दोन्ही बाजूस हनुमान, शंकर अशा काही देवांच्या मूर्त्या आहेत. या ठिकाणी गुंफा असल्याने मंदिराच्या उजव्या बाजूला डोंगरात कोरून काढलेल्या काही ओवऱ्या आहेत. कुकडी नदी ओलांडल्यानंतर मंदिर डोंगरात असल्याने जवळपास २८३ पायऱ्या चढून वर जावे लागते.